पुणे जिल्ह्यात 60 टक्के मतदान

पुणे- मागील पाच वर्षांत राज्यात झालेली सत्तांतरे, पक्ष फुटाफुटी आणि उदयास आलेली नवीन महाविकास आघाडी आणि नवीन महायुती त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही लक्षवेधी ठरली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 21 विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. 21 जागांसाठी तब्बल 303 उमेदवारांचे भवितव्य बुधवारी इव्हीएमध्ये बंद झाले. दरम्यान, मतमोजणी येत्या शनिवारी (दि.23) होणार आहे.
जिल्ह्यातील 21 मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यात एकूण 88 लाख 49 हजार 590 मतदार आहेत. तर जिल्ह्यात एकूण 8 हजार 562 मतदान केंद्र होती. या सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यातील 21 मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या दरम्यान सरासरी 5.53 टक्के मतदान झाले. शहरी व ग्रामीण भागात सकाळपासून मतदान केंद्रांवर गर्दी केली होती.
पहिल्या दोन तासांत वडगाव शेरीमध्ये 6.37 टक्के झाले. चिंचवडमध्ये 6.80 टक्के, पर्वतीमध्ये 6.30 टक्के , बारामतीमध्ये 6.20 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 15.64 टक्के मतदान झाले. तर दुपारी एक पर्यंत जिल्ह्यात 29.03 टक्के मतदान झाले. दुपारनंतर काही मतदारसंघात मतदानासाठी मतदारांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 41.70 टक्के मतदान झाले. दुपारनंतर पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून आले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात मतदानाची सरासरी 54.09 टक्के होती. जिल्ह्यात सायंकाळी पाच पर्यंत सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये झाल्याचे दिसून आले. या मतदारसंघात 64.50 टक्के मतदान झाले. आंबेगावमध्ये 63.87 टक्के, जुन्नरमध्ये 62.12 टक्के, खेडमध्ये 61.57 टक्के, शिरूरमध्ये ५८.९० टक़्के, बारामतीमध्ये 62.31 टक्के मतदान झाले. वडगाव शेरी मतदारसंघात 50.46 टक्के, शिवाजीनगरमध्ये 44.96 टक्के, कोथरुडमध्ये 47.42 टक्के, खडकवासलामध्ये 51.56 टक्के, पर्वतीमध्ये 48.65 टक्के, हडपसरमध्ये 45.02 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 47.83 टक्के आणि कसबा मतदारसंघात 54.91 टक्के मतदान झाले.
महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्यात अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बारामतीमध्ये अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार अशी थेट काका-पुतण्यामध्ये लढत होती. मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीच्या लढती होत आहेत.





