Chitra Wagh : तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते; चित्रा वाघ यांचा अनिल परबांवर पलटवार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरून आज सभागृहात चर्चा पार पडली. यावेळी अनिल परब यांनी मंत्री संजय राठोड यांच्या केसचे काय झाले? सत्ताधारी पक्षातील महिला आमदार आता का शांत आहेत? असा सवाल केला. त्यांच्या या सवालानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या.
अनिल परब काय म्हणाले?
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी विधान परिषदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिवसेना आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तत्कालिन परिस्थितीत चौकशी यंत्रणांनी चौकशी केली, त्यात कुणीही दोषी आढळले नाही. न्यायलयात याचा फैसला होईल. पण सत्ताधाऱ्यांमध्ये सध्या मंत्रिपदावर असलेल्या एका नेत्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांची लढाई कुठवर आली, पुढे त्या लढाईचे काय झाले? असे अनेक प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केले.
चित्रा वाघ यांचा पलटवार
अनिल परब यांच्या प्रश्नांना चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. अनिल परब तुम्ही मोठे वकील असाल, तुम्ही मोठे पोपटपंडित असाल… पण मी तुम्हाला घाबरत नाही. माझ्या परिवाराने सहन केलं ते बघायला तुम्ही आला नव्हतात. पाय खेचायला १०० लोक असतात. तुमच्यासारखेही असतात. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं का, इथे काय वशिल्याने आले नाही.. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर पलटवार केला.
अनिल परब यांना दिला इशारा
संजय राठोडविरोधात मी लढलेली लढाई सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या चेल्याचपाट्यांनी त्रास देऊनही मी मागे हटले नाही. पण त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना क्लिनचिट कशी दिली? हा प्रश्न हिम्मत असेल तर अनिल परब यांनी उद्धव ठाकरे यांना विचारा असे आवाहन चित्रा वाघ यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे सभागृहात आले तर मी त्यांना याबद्दल विचारेन. मला हलक्यात घेऊ नका, असेदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.
दिशा सालियन प्रकरणावरून खोचक प्रश्न
दिशा सालियन प्रकरणाचा एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितला, तर तुमची ही हालत झाली आहे. जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल, त्यावेळी काय होईल, असा खोचक प्रश्नदेखील चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.





