चित्रपट दाखविण्याच्या आमिषाने 5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

बारामती – बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आजिनाथ सावळाराम शिंदे (वय 55 रा. चिमणशा मळा ) यास तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा येथील न्यायाधीश शहापुरे यांनी सुनावली. शहरात चिमणशा मळा येथे 27 एप्रिल 2018 रोजी ही घटना घडली. आरोपीने एका पाच वर्षाच्या मुलीला घरात चित्रपट दाखवण्याच्या आमिषाने बोलून लैंगिक अत्याचार केला.
सदरची घटना लक्षात येताच आजूबाजूच्या मुलांनी पीडितेच्या आईस सांगितले. तात्काळ त्यांनी सदर ठिकाणी जाऊन पुढील अत्याचार थांबवला. सदर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कलम (8 ,12 )प्रमाणे गुन्हा नोंद झाला. महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात तात्काळ सादर केले.
केस अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी काम पाहिले. कोर्टातील साक्षीदारांना कडून वदवून घेण्यासाठी कोर्ट पैरवी म्हणून व्ही. एल लोकरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांनी काम केले. पोलिस कर्मचारी निकम यांनी वेळेत समन्स बजावणी केली. सरकारतर्फे सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला. न्यायाधीश शहापुरे यांनी आरोपीला बाललैंगिक अत्याचार 3 वर्ष सश्रम कारावास व सहाशे रुपये दंड व दंड वसूल करून पिढीतेला देण्याबाबतचा आदेश केला आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी लोकरे व निकम यांचा बारामती शहर पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला. याप्रकारे शिक्षा लागल्यानंतर समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसून या प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होणार असल्याचे मत पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले.





