उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 49 कोटींचा मुद्देमाल जप्त

धुळे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये ६ कोटी ५३ लाख रुपये, ५२ अग्निशस्त्रे व ८९ काडतुसे, १५३ इतर घातक शस्त्रे, ५ कोटी ७५ लाख किंमतीची अवैध दारु, २ कोटी ६७ लाख रुपयांचा गांजा व ३४ कोटी रुपयांचा मौल्यवान दागिने व प्रलोभन वस्तू असा एकूण ४९ कोटी ०७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे म्हणाले, विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नाशिक परिक्षेत्रीय अहिल्यानगर, जळगाव, नाशिक ग्रामीण, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांमध्ये केंद्रिय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केल्या जात आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये २६४ भरारी पथके तयार करण्यात आले आहेत. गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवरील नाशिक, धुळे, जळगांव व नंदूरबार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर एकूण ३८ चेकपोस्ट व ३४ मिरर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
या चेकपोस्टवरील तपासणीत आत्तापर्यंत दोन कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी व विविध विभाग प्रमुखांसोबत समन्वय बैठका घेऊन निवडणूक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गुजरात व मध्यप्रदेश राज्यांशी विविध स्तरांवर सराईत गुन्हेगार, उपद्रवी इसम, अवैध हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.
१६,९८१ जणांवर कारवाई
पाचही जिल्ह्यांमधील १६,८९१ सराईत गुन्हेगार व उपद्रवी व्यक्तींविरुध्द विविध कलमांखाली प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्ती असून, एमपीडीए अंतर्गत १२ सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. १२३ गुन्हेगारांविरुध्द तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, असेही कराळे यांनी सांगितले.





