प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – खेड तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या रोहित्र चोरीच्या मालिकेमुळे नागरिकांची यंदाची दिवाळी अंधारात साजरी होण्याची शक्यता आहे. तब्बल ४८ पेक्षा जास्त रोहित्रांची चोरी झाल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांत गुन्हे दाखल होऊनही तपास मात्र शून्य अवस्थेत आहे. रोहित्र चोरीमुळे अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला असून, ऐन सणासुदीत वाड्या-वस्त्यांवर अंधार पसरला आहे. या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या हातपंपाच्या मोटारी बंद पडल्या असून, पिकांना पाणी देण्याचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रोहित्र नसल्याने पसरलेल्या अंधारामुळे रात्रीच्या वेळी बिबट्याच्या वावराची दहशत अधिक वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी रात्री पिकांना पाणी द्यायला जाणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखे झाले आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, इतक्या मोठ्या संख्येने नवीन रोहित्र शासनाकडून मिळवणे अवघड ठरत असल्याने वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब होत आहे. चोर मोकाट, आम्ही अंधारात.. नागरिकांमध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “सहा महिन्यांपासून चोरी सुरू आहे, पण एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही. चोर मोकाट आणि आम्ही अंधारात आहोत,” असे संतप्त नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी विशेष तपास पथक नेमून या चोरींना आळा घालावा आणि महावितरणने तातडीने नवीन रोहित्र पुरवावे, जेणेकरून सणाच्या काळात तरी नागरिकांना उजेड मिळेल, अशी मागणी नागरिक करत आहेत. महावितरणचे लाखोंचे नुकसान.. खेड तालुक्यात एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत ४८ रोहित्रांची चोरी झाली आहे. १०० केव्ही रोहित्राची किंमत तीन ते साडेतीन लाख, तर २०० केव्ही रोहित्राची किंमत साडेचार ते पाच लाख रुपये असते. १०० केव्ही रोहित्रात ७० ते ८० किलो तांब्याची तार आणि २३० लिटर ऑईल असते. २०० केव्ही रोहित्रामध्ये १२० ते १३० किलो कॉपर असते. झटपट पैसे मिळवण्यासाठी चोरट्यांनी वीज रोहित्र लक्ष्य केले असून, यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याची दहशत वाढली.. जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, सहा महिन्यात ४८ रोहित्र चोरी झाल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन रोहित्र उपलब्ध होत नाहीत. वीज नसल्याने अनेक गावांमध्ये ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे आणि दुसरीकडे बिबट्याची दहशत वाढली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी त्वरित चोरट्यांना जेरबंद करावे, अन्यथा भविष्यात अनेक गावांमध्ये अंधार पसरेल.