46 वर्षांपूर्वी प्रभात : भारत-द. कोरिया करार

भू-सुधारणा कायद्यासाठी निश्चित काळ आखा
नवी दिल्ली, दि. 5 – जमीन सुधारणा कार्यक्रमाची जलद अंमलबजावणी करण्यासाठी निश्चित काळ आखून घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले आहे.
जमीन-सुधारणा कायदा आणखी सुटसुटीत करण्याची गरज आहे, असे सांगून गांधी म्हणाल्या, जादा जमीन जाहीर करण्यापासून ते सदर जमिनीचे वाटपापर्यंत या कायद्यात सोपेपणा आणण्याची आवश्यकता आहे. जमीन सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होऊ नये या स्वार्थी हेतूचे लोक असावेत म्हणून अंमलबजावणीत गलथानपणा दिसून येतो.
दूरचित्रवाणीसाठी स्वतंत्र विभाग असणार
नवी दिल्ली – दूरचित्रवाणीसाठी “दूरदर्शन’ (टेलिव्हिजन इंडिया) नावाचे एक वेगळे खाते 1 एप्रिलपासून उघडण्यात येणार असून त्याच्या प्रमुखपदी एक महासंचालक असतील. (सध्या दूरचित्रवाणीचे काम आकाशवाणीतर्फेच चालते)
भारत-द. कोरिया करार
सेऊल – विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारत व द. कोरिया यांच्या दरम्यान आज एक करार झाला. भारताच्यावतीने भारताचे राजदूत सय्यद मुझफ्फर आगा व कोरियाचे परराष्ट्रमंत्री पार्क-तोंग-जीन यांनी करारावर सह्या केल्या.





