46 वर्षांपू्र्वी प्रभात : प्रबळ सरकारे जनतेची चांगली सेवा करू शकतील

प्रबळ सरकारे जनतेची चांगली सेवा करू शकतील
बिस्सामकट्टक – केंद्र व राज्य सरकारे प्रबळ असतील तर ती जनतेची अधिक चांगली सेवा करू शकतील, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या. राष्ट्राच्या प्रगतीसाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने पूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकांनी हे कार्यक्रम समजावून घेऊन त्यापासून जास्तीत जास्त फायदा घेण्यास शिकले पाहिजे. तसेच अंमलबजावणीत काही कमी असेल तर ती निदर्शनास आणून दिली पाहिजे. जनतेने हे कार्यक्रम आपले स्वतःचे मानावेत. कारण ते जनतेच्या फायद्यासाठीच आहेत. देशात एक्य असेल तर प्रगती अधिक वेगाने होईल, असेही इंदिरा गांधी म्हणाल्या.
प्रयागच्या त्रिवेणी संगमात लाखो यात्रेकरूंचे स्नान
कुंभनगर – आज पौष पौर्णिमेच्या दिवशी येथील कुंभमेळ्यास जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याला सुरुवात झाली. लाखो भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. यंदाच्या या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे गंगेचे पात्र दुभंगले गेले असून त्यामुळे आपोआप दोन ठिकाणी संगम निर्माण झाले आहेत. त्यांच्यामध्ये सुमारे 80 हेक्टर क्षेत्राचे बेट तयार झाले आहे.
यात्रेकरूंची एकाच ठिकाणी गर्दी होत असे ती यामुळे दोन ठिकाणी विभागली जाण्याची आपोआप सोय झाली आहे. होड्यांवर, पडावांवर छोटीछोटी “तरंगती देवळे’ उभारली आहेत. अनेक भाविकांनी तेथे दर्शनाचा लाभ घेतला आहे.





