पुणे | अकरावी प्रवेशाच्या ४३ हजार जागा रिक्तच

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीसाठी ७७ हजार ६०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून अद्यापही प्रवेशाच्या ४३ हजार १९६ जागा रिक्तच आहेत.
या प्रवेशासाठी सहाव्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रवेशाची ही शेवटची विशेष फेरी आहे.
३४० कनिष्ठ महाविद्यालयात १ लाख २० हजार ८०५ प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. त्यात कॅप च्या १ लाख ४ हजार ६६ तर कोट्य़ाच्या १६ हजार ७३९ जागांचा समावेश आहे.
प्रवेशासाठी १ लाख ३ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ९४ हजार ३८३ अर्ज भरुन लॉक करण्यात आले आहेत. कॅप अंतर्गत ६८ हजार ३९४ तर कोटा अंतर्गत ९ हजार २१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.
कॅपच्या ३५ हजार ६७२ तर कोटाच्या ७ हजार ५२४ एवढ्या जागा रिक्तच पडल्या आहेत. सहावी विशेष फेरी ही शेवटची विशेष फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक राहील. या फेरी नंतर डेली मेरीट राऊंड ही फेरी होईल.
वेळापत्रक : सहावी विशेष फेरी
१८ ते २१ सप्टेंबर – प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करुन अर्जाचा भाग-१ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. एटीकेटी सवलत मिळालेले विद्यार्थीही या फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे.
२२ ते २३ सप्टेंबर – डेटा प्रोसेसिंंगची अंतर्गत कारवाई करणे, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे. २४ सप्टेंबर – विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे, विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविणे, फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविणे.
२४ ते २५ सप्टेंबर – मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे व प्रवेश नाकारणे, विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत मिळालेल्या महाविद्यालयास भेट देऊन आपला प्रवेश नक्की करणे.
२५ सप्टेंबर – प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर दर्शविणे, कोट्यातील रिक्त जागा समर्पित करणे, फेरी अखेरची रिक्त जागा दर्शविणे.



