नवी दिल्ली – पाकिस्तानी सैन्याने गुरूवारी रात्री हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून सीमा परिसरात जोरदार गोळीबार करण्यात आला. तसेच घुसखोरीही करण्यात आली. यावर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यासोबत भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ड्रोनही पाडले. या ड्रोनचा उद्देश भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करणे हा होता. हे ड्रोन तुर्कीमध्ये बनलेले होते. पाकिस्तानने ३६ ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोन्सने हल्ल्यांचा प्रयत्न केला. यानंतर भारताने ड्रोन्सच्या मदतीने प्रति हल्ले करत त्यांचा हा डाव हाणून पाडला. या घडामोडींची माहिती कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा रडीचा डाव उघडा पाडला. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने चार हवाई संरक्षण स्थळांवर सशस्त्र ड्रोन सोडले. यापैकी एका ड्रोनने त्यांची एडी रडार नष्ट करण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतर पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील तंगधार, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उधमपूर येथे जड कॅलिबर तोफखाना आणि सशस्त्र ड्रोनचा वापर करून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यात काही भारतीय सैनिक शहीद झाले. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. तसेच पाकिस्तानचे पुंछ, मेंढर यांसारख्या अनेक सेक्टरमध्ये ड्रोन पाडण्यात आले. याशिवाय गोळीबारही करण्यात आला. पाकिस्तानकडून भारतीय लष्करी ठिकाणे आणि नागरी वस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंजाबमधील भठिंडा एअरबेसला निशाणा बनवण्यात आले. या ड्रोनची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले, असेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले. पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला जात आहे. पाकिस्तानने गुरूवारी भारताची हवाई हद्द पार केली. भारताने नागरी विमानांवर हल्ला न करता संयम बाळगला. पाकिस्तानच्या गोळीबारात काही स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय सैन्याने अत्यंत जबाबदारीने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील एक रडार उद्धवस्त करण्यात भारताला यश मिळाले, असे त्यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानने एका ख्रिश्चन शाळेला आणि गुरुद्वाराला लक्ष्य केले. ख्रिश्चन शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी परराष्ट्र खात्याकडून देण्यात आली.