Pune News : गुंतवणुकीच्या आमिषाने वाघोलीतील ४० वर्षीय व्यक्तीची २९ लाखांची फसवणूक

वाघोली : शेअर बाजारात गुंतवणुक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वाघोली येथील ४० वर्षीय व्यक्तीची २९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याआला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उबाळेनगर येथील व्यातीच्या व्हॉटसअॅप वर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याला दाखविले होते. व्यक्तीने शहानिशा न करता चोट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती घेतली.
त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात व्यक्तीने वेळोवेळी २९ लाख ८० हजार रुपये जमा केले. सायबर चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला परतावा मिळाल्याचे ऑनलाईन भासविले. प्रत्यक्षात चोरट्यांनी त्याला परतावा दिला नाही. व्यक्तीने परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा टाळाटाळ केली. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद करुन ठेवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यक्तीने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.




