ओरिसातील 35 कामगारांना लाओसमध्ये ओलीस ठेवले; नवीन पटनायक यांनी केली तात्काळ मदत

Workers Held Capative In Laos: दक्षिण पूर्व आशियातील लाओस या देशात ओरिसातील 35 कामगारांना ओलीस ठेवण्यात आले आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्या कामगारांनी व्हिडिओद्वारे ही माहिती समोर आणली आहे. ज्या कंपनीत ते काम करत होते, त्यांनी त्यांना ओलीस ठेवले होते, अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दिली आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून कामगारांनी गावातील लोकांना दिली त्यानंतर गावकऱ्यांनी ही माहिती राज्य सरकारपर्यंत पोहचवली. “ज्या कंपनीत ते काम करत होते, त्या कंपनीचे काम दीड महिन्यांपूर्वी संपल्याचे त्यांनी सांगितले. पण आता कंपनी त्यांना थकीत पगारही देत नाही आणि त्यांना त्यांच्या देशात परत येऊ देत नाही.” असा आरोप त्यांनी केला होता.
त्यासोबतच “आमच्याकडे पैसे नाहीत, अन्न नाही. आम्हाला परत येऊ दिले जात नाही,” सरोज पलाई या कामगाराने व्हिडिओमध्ये सांगितले. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कामगारांनी आरोप केला आहे की कंपनीने त्यांचे पासपोर्टही हिसकावले आहेत. ही बाब ओरिसा सरकारच्या निदर्शनास येताच मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामगारांना परत आणण्याचे आदेश दिले.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “ओरिसा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, राज्याच्या कामगार आयुक्तांनी हा मुद्दा लाओसमधील भारतीय दूतावासाकडे मांडला आहे. ते म्हणाले की, दूतावासाने ओडिशा सरकारला कळवले आहे की कामगारांच्या सुरक्षित भारतात परतण्यासाठी सर्व पावले उचलली जातील.” अशी माहित देण्यात आली आहे.





