नवी दिल्ली : पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीतून विकासाला चालना देण्यासाठी या अर्थ संकल्पात भांडवली गुंतवणुकीत 34.5 टक्क्यांची वाढ करण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार सन 2021-22 या आर्थिक वर्षात भांडवली गुंतवणूक साडे पाच लाख कोटींवर जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की गेल्या वर्षी भांडवली खर्चासाठी 4 लाख 12 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती पण आम्ही प्रत्यक्षात त्यापेक्षाही जादा खर्च केला आहे असे त्या म्हणाल्या, हा खर्च सुमारे 4 लाख 39 हजार कोटी रूपयांवर गेला आहे. नवीन आर्थिक वर्षात यावर 5लाख 54 हजार कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. जे विभाग चांगले नियोजन आणि चांगली कामे करतील त्यांच्या जादा खर्चासाठी 44 हजार कोटी राखून ठेवले जातील असेही त्यांनी सांगितले. त्याखेरीज राज्य सरकार आणि अन्य स्वायत्त संस्थांच्या खर्चासाठी दोन लाख कोटी रूपयांची रक्कम उपलब्ध होणार असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक ओघ येईल असे त्या म्हणाल्या. राज्य सरकारांनाही पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करावा यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करू असेही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.