Pune Zilla Parishad Budget: पुणे जिल्हा परिषदेचा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प
Pune Budget: शिक्षण, आरोग्य, 'एआय' तंत्रज्ञानावर विशेष भर

Pune Budget: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ३०१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केल्यानंतर मंजूर करण्यात आला.
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अर्थसंकल्प सादर करताना शिक्षणातील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता), आरोग्य आणि सौरऊर्जेवर आधारित शाश्वत विकासावर प्रामुख्याने भर दिला आहे. ६८ लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात १४ नव्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाचे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे २०० वे जयंती वर्ष आहे. यानिमित्ताने सामाजिक न्याय, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीला अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी ठेवले असून, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही ‘एआय’ साधनांचे व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
युरोपियन स्पेस सेंटरसाठी २५ विद्यार्थ्यांची निवड
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तकातील विज्ञान प्रयोगातून शिकवणे हा उपक्रम राबविला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या यशस्वी प्रयोगानंतर यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये इस्रोसाठी ५० विद्यार्थी, नासासाठी २५ विद्यार्थी आणि प्रथमच युरोपियन स्पेस सेंटरसाठी २५ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. याशिवाय निपुण पुणे योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार केला जाणार आहे.
महिला आणि कन्या सुरक्षा
महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी विशेष तरतूद केली असून, ९ ते १४ वयोगटांतील मुलींसाठी कन्या सुरक्षा योजनेअंतर्गत त्यांचे लसीकरण केले जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलींची मासिक पाळीदरम्यान शाळांमधील अनुपस्थिती रोखण्यासाठी शाळांमध्ये पिंक रूम कक्ष स्थापन केले जातील.
या कक्षात पूर्ण गोपनीयता, प्राथमिक उपचार आणि सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता असेल. याशिवाय विधवा व परित्यक्ता महिलांसाठी माझे अस्तित्व ही योजना राबविण्यात येत आहे.
शाश्वत ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन
ग्रामीण भागात गावचा सूर्य, गावची वीज ही महत्त्वाकांक्षी योजना आखली असून, पडीक व ओसाड जमिनीवर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती केली जाईल. गावासाठी वापरून उरलेली वीज महावितरणाला विकली जाईल.
घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा कचरा, माझी जबाबदारीअंतर्गत सहा ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.
फेलोशिप कार्यक्रम
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी तरुण पदवीधरांसाठी फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्यातून अकरा महिने तरुणांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव दिला जाईल.
समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या फेलोशिपच्या धर्तीवर सर्वसाधारण गटांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती गजानन पाटील यांनी दिली.
महत्त्वाचे मुद्दे
* विद्यार्थी व शिक्षकांसाठी ‘एआय’ तंत्रज्ञान
* सहा ठिकाणी धनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
* ६०६ शाळा माॅडेल स्कूल
* उत्कृष्ट शाळांना सीबीएसईचे संलग्नीकरण
* ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करणार
* दुबई शाॅपिंग फेस्टिव्हलमध्ये बचत गटांच्या महिलांचा समावेश
Motor Vehicle tax : जुन्या वाहनांना दुप्पट कर आकारणी; स्क्रॅपिंग पाॅलिसीत नवीन वाहन खरेदीवर करसवलत





