Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर.! मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, काय म्हणाले? पाहा….
अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले. २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Budget 2026 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा सन २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः हा अर्थसंकल्प मांडला. मुख्यमंत्री म्हणून हा त्यांचा पहिला, तर एकूण कारकिर्दीतील दुसरा अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्र्यांनी ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले. २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, २०३५ मधील राज्याचा अमृत महोत्सव आणि २०४७ मधील देशाचे शताब्दी वर्ष डोळ्यासमोर ठेवून अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
राज्याच्या संतुलित विकासासाठी फडणवीस यांनी चार प्रमुख स्तंभांची घोषणा केली. यामध्ये प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक व सुशासन या चार स्तंभांअंतर्गत १६ उपक्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे. इथून पुढच्या सर्व अर्थसंकल्पांमध्ये ‘विकसित महाराष्ट्राच्या’ संकल्पाचे प्रतिबिंब दिसेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारचे आभार: Maharashtra Budget 2026
१६व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांत भरीव निधी मिळणार असून, आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राने वाढीव निधी देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या प्रस्तावित जलदगती रेल्वे प्रकल्पांमुळे राज्याच्या उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाने आपला अहवाल सादर केला असून, पुढील अधिवेशनात तो पटलावर ठेवला जाईल. या आयोगाच्या शिफारसींनुसार आर्थिक विकेंद्रीकरण करून स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम केल्या जातील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.






