पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत 300 मोबाईल चोरीला

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत २८ तासांत तब्बल ३०० नागरिकांच्या मोबाइलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थ आदी पोलीस पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ९१ मोबाइल चोरीला गेले आहे. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाइल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून २ लाख ७९ हजाराचे २१ मोबाईल हस्तगत केले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, कुवळेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विसर्जन मिरवणूक २८ तास सुरू होती. या दरम्यान मोबाइल चोरट्यांनी लक्ष्मी रोड तसेच अलका चौकात मोठी हातसफाई केली. यामुळे एकट्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात विसर्जनाच्या दिवशी ९१ मोबाइल चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले. तर उत्सवाच्या दहा दिवसांत २५ मोबाइल चोरीला गेल्याची नोंद आहे.
दरम्यान. फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, अंमलदार गजानन सोनुने, नितीन जाधव यांच्या पथकाने मध्यप्रदेश तसेच नाशिक जिल्यातील टोळीतील फैजल अजीज खान (वय २२,रा.नाशिक) आणि कालू राजू पारखी (रा.मध्यप्रदेश) या दोघांना अटक करत २ लाख ७९ हजाराचे २१ मोबाइल हस्तगत केले. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले की, आरोपींची टोळी गणेशोत्सवात पुण्यात होती. ते भाविकांचे मोबाइल चोरुन त्यातील सिमकार्ड तत्काळ फेकून देत, मोबाइल बंद करत असत. त्यांना वेळीच अटक केल्याने मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचा अनर्थ टळला.
आयफोन टार्गेट…
मोबाइल चोरांनी मोठ्या प्रमाणात आयफोनवर लक्ष केंद्रीत केले होते. यामुळे आयफोन चोरीला गेल्याच्या तक्रारीही जास्त आहेत. सेकंड हॅण्ड बाजारात आयफोनला चांगली मागणी आहे. तसेच आयफोन ट्रेस होऊ नये असे तंत्रज्ञानही चोरट्यांनी अवगत केले आहे.
महिलांची टोळी जेरबंद…
गणेश विसर्जन मिरवणूकीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नाशिक जिल्हयातील दोन महिला आरोपींना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत नवी मुंबई येथील १४० ग्रॅम (९ लाख ८० हजार) सोन्याचे दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस आला. गिता वेंकटेश खट्टी (वय २०) आणि पुजा प्रविण गाझू (वय २४, दोघीही रा. रा.पाथर्डी, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. फरासखाना पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, अंमलदार गजानन सोनुने व रेखा राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





