Delhi blast case : दिल्ली स्फोटप्रकरणी आणखी ३ अटकेत; अंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड

नवी दिल्ली – दिल्ली स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांची देशभरात कारवाई सुरू आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान प्रायोजित एका आंतरराष्ट्रीय आणि अंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करत आणखी तीन जणांना अटक केली आहे.
या संपूर्ण नेटवर्कचे संचालन पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शाहजाद भट्टी करत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भट्टी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या निर्देशानुसार काम करतो, असे पोलिसांनी सांगितले.
स्पेशल सेलच्या टायगर युनिटने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या मॉड्यूलवर छापा टाकला. एक आरोपी पंजाबातील गँगस्टर नेटवर्कशी जोडलेला असून तो शस्त्र आणि स्फोटक तस्करीत सक्रिय होता.
इतर आरोपींना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून पकडले. पोलिसांच्या मते, सर्व आरोपी शाहजाद भट्टीच्या नेटवर्कअंतर्गत काम करत होते आणि हे संपूर्ण मॉड्यूल पाकिस्तानमधून चालवले जात होते.





