farmers : राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा; मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट सांगितलं…

farmers – पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा देऊन शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.
राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1,071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महानिर्मिती ही म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी असून, सुमारे 13,880 मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक आहे. नॅशनल थर्मल पॉवर कंपनी नंतर (एनटीपीसी) ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची राज्य मालकीची जनरेशन कंपनी आहे.
औष्णिक, वायू, जल विद्युत आणि सौर असे ऊर्जा उत्पादन क्षेत्रात वैविध्य असलेली महानिर्मिती ही कंपनी नवीकरणीय ऊर्जेचे प्रकल्प सुरू करत आहे, ज्यामुळे वीज ग्राहकांना कमी दरात वीजपुरवठा करत कार्बन उत्सर्जनात घट होण्यास मदत होणार आहे.





