Nagar | ऊस उत्पादनात २५ ते ३० टक्के घट

शेवगाव, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांत लागोपाठ झालेल्या पावसामुळे शेवगाव परिसरात बहुतेक ऊस पिकावर तांबेरा, तपकिरी ठिपके, बुरशी , पांढरी माशी, पुक्शीनिया अशा रोगांचा प्रादर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
त्यात ३ ते ५ महिन्याच्या उसाच्या क्षेत्रावर हे रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे.
ऊसावरील विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत तालुका कृषी विभाग परिसरातील साखर कारखान्याचा कृषी विभाग यांच्याकडून मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी याबाबत ९ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे.
या परिपत्रकात या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी करावयाच्या अत्यावश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
मात्र, हे परिपत्रक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अजून पोहचले नसल्याची माहिती त्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे .





