Pune District : जैविक पद्धतीने एकरी 105 मेट्रिक टन ऊस उत्पादन

पाटस : दोन डोळा पद्धतीने उसाची लागण करून जैविक व सेंद्रिय खतांच्या योग्य नियोजनाने एक एकर क्षेत्रात 105 मेट्रिक टन ऊसाचे उत्पन्न चालू हंगामात घेऊन यापूर्वीचा शंभर टन प्रती एकर उत्पादनाचा विक्रम दौंड तालुक्यातील पाटस येथील अल्पभूधारक शेतकरी सुरेश वाबळे यांनी मोडीत काढला आहे. वाबळे यांनी कमी खर्चात अधिक ऊस उत्पादनाचा नवा मार्ग परिसरातील शेतकर्यांसमोर ठेवला आहे.
दौंड तालुक्यात बागायती क्षेत्र म्हणून पाटसची ओळख परिसरात आहे. पाटस परिसरात पाणी मुबलक प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी ऊसाची लागवड करतात. पाटस येथील वाबळे कुटुंब गेले अनके वर्षांपासून चोपन मातीमध्ये परंपरागत शेती करून जेमतेम पिकांचे उत्पादन घेत होते. सुरेश वाबळे यांचे शिक्षण कमी असले तरी वाचन, नव्या गोष्टी शिकणे व तज्ज्ञ शेतकर्यांकडे पीक पाहणी करण्याची त्यांना आवड होती. वाबळे यांनी 2021 मध्ये रामा ऍग्रोटेक कंपनीच्या माध्यमातून जैविक पद्धतीने शेती करत डाळिंब उत्पादन विक्रम केला होता.
जैविक शेतीची आवड असल्याने वाबळे परिसरातील शेतकर्यांकडे पीक पाहणी करून त्यांना रासायनिक शेती कडून जैविक शेतीकडे वळवून विक्रमी उत्पादन काढण्यावर त्यांचा भर आहे. त्या दृष्टीने कमी क्षेत्रात व कमी खर्चात उत्पादन वाढ व जमिनीचा पोत टिकवणे या सुत्रीच्या वापर करत शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन त्यांनी सुरू केले. ऊस वाढीसाठी जैविक पद्धतीने पोषक घटक देण्याचे धोरण सुरेश वाबळे यांनी स्वीकारले. जमिनीची काळजी घेताना सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. जमिनीची काळजी घेताना सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्याचा प्रयत्न, उसाच्या वाढीनुसार पाचट साळणे आणि दोन सरांच्यामध्ये आच्छादन करणे हा दरवर्षीचा नित्य नियमाने उपक्रम असल्याने ऊस उत्पादनात वाढ होते.
यापूर्वी कांदा पीक घेतलेल्या शेताची मशागत करून चार फुटांची सरी काढली. 15 जुलै 2023 रोजी घरगुती 86032 जातीच्या ऊसाची लागवड केली. जैविक खत व औषध निर्माण कंपनी रामा ऍग्रोटेकची उत्पादने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाला वेळोवेळी डोस दिले. ऊस उत्पादक वाढीसाठी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केला.
पारंपरिक ते प्रगतशील शेतकरीपर्यंत प्रवास
जैविक, सेंद्रिय घटकांच्या वापरातून रासायनिक खतांचा वापर बंद केला. त्यातूनच शेती अधिक उत्पादनक्षम होण्यास मदत झाली आहे. पाटस येथील भीमा साखर कारखान्याकडून संतोष वाबळे यांच्या ऊसाची तोडणी पूर्ण झाली असून 40 आर क्षेत्रात ऊसाचे एकूण 105 मेट्रिक टन उत्पादन घेतले आहे. परंपरागत व रासायनिक शेतीला फाटा देत जैविक व सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यानंतर शेतीचे उत्पादन वाढते व शेती फायद्याचे वाबळे यांनी सिद्ध केले आहे. सुरेश वाबळे यांनी परंपरागत शेतीपासून प्रगतशील शेतकरी पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
उत्पन्नाची पद्धत
लागवडीसाठी चार फुटांचे सरीतील अंतर
उसाची जात – 86032
फुटवा आणि वाढीसाठी पहिला डोस
ऊस बांधणी वेळी जैविक खतांची मात्रा
वेळोवेळी पाट पाण्यातून जैविक उत्पादनांची आळवणी
रासायनिक खतांमुळे शेतीच्या नुकसानी सोबत उत्पादनामध्ये वाढ होत नव्हती. यामुळे जैविक व सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. जैविक रामा ऍग्रोटेक कंपनीबाबत माहिती घेऊन पहिल्या वर्षी ऊसाचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
– सुरेश वाबळे, ऊस उत्पादक शेतकरी, पाटस)
.





