Pune District : 55 गुंठ्यात 120 टन उसाचे उत्पन्न

वाल्हे : पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील वेगळी ओळख मांडकी गावातील ऊस उत्पादक शेतकर्यांमुळे होत आहे. श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी गावचे प्रयोगशील शेतकरी अशोक सधु शिंदे व त्यांचा मुलगा सचिन अशोक शिंदे या बाप- लेकांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच सेंद्रिय खताचा वापर करून ऊसाच्या 86032 या वाणाचे एकरी 110 टन उत्पादन घेऊन पुरंदर तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे.
सचिन शिंदे यांनी चालू हंगामामध्ये 55 गुंठे क्षेत्रात (22 पांड) 120 टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेतले आहे. एकरी सरासरी 110 टन उसाचे उत्पादन मिळवण्यात यश आले असून अशोक सधु शिंदे यांनी 17.5 गुंठे क्षेत्रात (7 पांड) 41 टन उसाचे उत्पादन घेतले असल्याची माहिती, कृषी अधिकारी अनिल दुरगूडे, कृषी सहायक नंदकुमार विधाते यांनी दिली.
या आगोदर,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद व मांडकी येथील प्रयोगशील शेतकरी दीपक सावंत व जयंत सावंत या बंधूंनी एकरी 102 टन उसाचे उत्पादन घेतले होते. यानंतर प्रयोगशील शेतकरी व सेवानिवृत्त प्राध्यापक मानसिंग जगतात यांनी एकरी 106 टन उसाचे उत्पादन घेतले. यानंतर, प्रयोगशील युवा शेतकरी सचिन गायकवाड यांनी यावर्षी ऐकरी 107 टन उसाचे उत्पादन घेतले होते.
यानंतर अशोक शिंदे, सचिन शिंदे या बाप-लेकांनी एकरी सरासरी 110 टनाचे यावर्षीचे आत्तापर्यंतचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. मांडकी येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र चालक माधव जगताप, शिंदे यांचे बंधू ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत अशोक शिंदे यांनी मार्गदर्शन केले असल्याची माहिती सचिन शिंदे यांनी दिली.
असे घेतले विक्रमी उत्पन्न
शिंदे यांनी शेणखत टाकून, शेतीची उभी-आडवी नांगरी केली. यानंतर साडेचार फुट सरी काढली. यामध्ये को-86032 उसाच्या रोपाची लागवड पावणे दोन फूट अंतरावर केली होती. ऊसरोप लागण नंतर चार दिवसांनी पहिले ड्रिचींग (आळवणी) केले. यानंतर 15 दिवसांनी दुसरे ड्रिचींग (आळवणी) दरम्यान, ह्युनिक ॅसिड, 12/61 खते वापरली. यानंतर 25 दिवसानंतर पहिला खताचा डोस दिला. एक महिन्यानंतर 15 दिवसांच्या फरकाने,तीन वेळेस औषध फवारणी केली. तीन महिन्यांनंतर कोंबड खत टाकून बाळबांधणी केली. 15 दिवसानंतर रासायनिक खते 40, सेंद्रिय खते 60 टक्के वापरून मोठी बांधणी केली. बांधणी नंतर दोन महिन्यांनंतर एक खतांचा डोस देऊन पाचट काढून घेतले होते. नंतर एक महिन्यानंतर ठिंबक सिंचनच्या माध्यमातून खते दिली होती.
एका उसाचा 46 टिपर्या
काढणीस आलेल्या एका उसाच्या टिपर्या 43 ते 46 इतक्या होत्या.तर,साधारणपणे एका उसाचे वजन साडेतीन ते चार किलो दरम्यान होते.मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट (व्हीएसआय) यांची जैविक खते दरवर्षी वापरत आहे.रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होत असून,तो टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खत,व इतर खतांचा वापर केला पाहिजे; असे ऊस उत्पादन शेतकरी सचिन शिंदे यांनी सांगितले.
अशी आहे मोजणी
क्षेत्रफळ = १ पांड = २.५ गुंठे
म्हणून २२ पांड = ५५ गुंठे
म्हणजेच दीड एकरला पाच गुंठे कमी
मांडकी (ता. पुरंदर) : येथील ऊस उत्पादन शेतकरी अशोक शिंदे, मुलगा सचिन शिंदे यांनी 120 टनांपर्यंत उत्पादन घेतलेला ऊस दाखविताना उत्पादक.





