Nagar | महसूल विभागातील २२९ कर्मच्यार्यांच्या होणार बदल्या!

नगर, (प्रतिनिधी) – एकाच ठिकाणी ३ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महसूल विभागातील २२९ कर्मचाऱ्यांच्या या आदेशाने बदल्या होणार आहेत.
केंद्रिय लोकसेवा आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वर्ष पूर्ण झालेल्या वर्ग एक आणि वर्ग दोन मधील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या केल्या होत्या.
आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ग तीन मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. महसूल विभागात वर्ग तीनची १ हजार ४४५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार १८ पदे भरलेले असून ४२७ पदे रिक्त आहेत.
तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण करणारे २२९ कर्मचारी बदलीस पात्र ठरले आहेत. तलाठी १४९, महसूल सहायक-४३, अव्वल कारकून २४, मंडलाधिकारी ९ आणि वाहन चालक ४ जणांचा समावेश आहे. येत्या १५ ऑगस्टपूर्वी या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.
सध्या जिल्ह्यात कार्यरत कर्मचारी संख्याबळ -अव्वल कारकून- १९१, मंडलाधिकारी- १२०, महसूल सहायक- २००, तलाठी – ४९३, वाहन चालक – १२ आहेत.
महसूल तहसीलदारपदी रवींद्र सबनीस
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील तहसीलदारपदी रवींद्र सबनीस यांनी बदली झाली आहे. जुन्नर (जि. पुणे) येथे ते कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेडचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांची या पदावर बदली झाली होती.
त्यांनी सहा महिनेच या पदावर काम केले. त्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची हातकंगले तहसीलदारपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर सबनीस यांची नियुक्ती झाली आहे.





