Big Scam : 2143 कोटींच्या महाघोटाळ्यात पुणे कनेक्शन उघड; खासगी बँकेतून 200 कोटी परदेशात, मुख्य सूत्रधार अखेर शरण
Big Scam : २,१४३ कोटींच्या घोटाळ्यात पुणे कनेक्शन समोर आले आहे. खासगी बँकेतून २०० कोटी परदेशात पाठवल्याचा संशय असून सीए श्याम कलानी शरण आला आहे.

Big Scam : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सीएने बोगस प्रमाणपत्रांचा गैरवापर करून केलेल्या तब्बल २,१४३ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. या घोटाळ्यातील सुमारे २०० कोटी रुपये पुण्यातील एका नामांकित खासगी बँकेच्या शाखेतून थेट परदेशात पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आयकर विभागाच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील बँकेतून २०० कोटींचे संशयास्पद व्यवहार –
आयकर विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, बनावट आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांची रक्कम पुण्यातील खासगी बँकेच्या शाखेतून परदेशात ट्रान्सफर करण्यात आली. एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळाच्या माहितीशिवाय झाले असण्याची शक्यता कमी असल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे.
त्यामुळे संबंधित बँकेचे अधिकारी आणि संचालक मंडळही चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे. या व्यवहारांमध्ये नेमकी कोणाची भूमिका होती, याचा तपास आता सुरू आहे.
सीएने केला अधिकारांचा गैरवापर –
सनदी लेखापालाने (CA) आपल्या अधिकारांचा गैरवापर करत हा मोठा परकीय चलन घोटाळा घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आयकर अन्वेषण विभागाचे उपायुक्त दीपककुमार यांच्या पथकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, या सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार सीए श्याम कलानी याने उदगीर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याच्या चौकशीतून पुण्यातील कोणती बँक आणि कोणते अधिकारी या व्यवहारांमध्ये सहभागी होते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पुण्यासह प्रमुख शहरांतील बँक व्यवहार तपासणार –
या प्रकरणाचा तपास पुण्यापुरता मर्यादित नसून बंगळुरू, चंदीगड आणि दिल्ली-एनसीआरमधील संशयास्पद बँक व्यवहारांकडेही तपास यंत्रणांचे लक्ष आहे. आयटी हब असलेल्या बंगळुरू आणि चंदीगडमधील बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर झाल्याचा संशय आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये बनावट कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे.
श्याम कलानीच्या आत्मसमर्पणानंतर या २,१४३ कोटींच्या महाघोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून, पुण्यातील बँकेची भूमिका तपासात महत्त्वाची ठरणार आहे.





