Pune District : श्रीनाथ म्हस्कोबाचे २ लाख गाळप पूर्ण

राहू : दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ४३ दिवसांत २ लाख टन ऊस गाळप केले आहे. कारखान्याचा एफआरपीसाठी चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे. हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे. हंगामात साखर कारखान्याचे सात लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे साखर उत्पादन व बाय प्रोडक्ट्स उत्पादने नियोजनानुसार सुरु आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली.
कारखान्याचा गाळप हंगामाचा आढावा सांगताना राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांनी लागण केलेल्या ऊसाची नोंद व क्रमवारीनुसार उसाची तोडणी व्हावी याकरीता कारखान्याने मोबाइल ॲप तयार केले आहे.
त्याप्रमाणे ऊस तोडणी प्रोग्राम करून उसाची तोड केली जात आहे. आलेल्या उसाचे वजन अचूक व्हावे याकरिता वजनकाटे शासनाकडून स्टॅम्पिंग करून घेतले जातात. वजन काट्यावर उसाचे वजन हे मनुष्यविरहीत पद्धतीने होते. ऊस घेऊन येणारा वाहतूकदार यांना वजनासाठी स्मार्ट कार्ड दिलेले आहेत. त्यानुसार ऊस मालकाचे नाव, वाह्तुकदाराचे नाव व इतर माहिती ऊस तोडणी स्लीपच्या स्वरूपात स्लिपबॉय मोबाल ॲपद्वारे ऊस फडातून निघण्याच्या अगोदर तयार करतात.
वाहतूकदार यांचे वाहन चालक कारखान्यावर वाहन घेऊन आल्यावर स्मार्ट कार्डद्वारे वाहन आल्याची नोंद नंबर टेकर कडे करून ऊस खाली करणे करीता त्यांचा नंबर आल्यावर तो स्वतः वजन काट्यावर स्मार्ट कार्ड दाखवून भर वजन व रिकामे वजन करतो. त्यास निव्वळ वजनाची पावती मिळते. उसाचे वजनाचे मेसेज दररोज शेतकऱ्यांना पाठवले जातात. मनुष्यविरहीत ऊस वजन ईआरपी प्रणालीद्वारे करणाऱ्या मोजक्याच कारखान्यांपैकी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना एक आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपास वाव नाही.
इतरांच्या तुलनेत बरोबरीत राहणार
राऊत म्हणाले की, यंदा कारखान्याचे दैनंदिन ऊस गाळप ५ हजार टन होत आहे. कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी बांधवांचा कल पाहता व शेतकऱ्यांचा ऊस लवकर गळीतास येऊन शिवार इतर पिकासाठी मोकळे व्हावे म्हणून पुढील वर्षी कारखान्याची ऊस गाळप क्षमता वाढविण्याचा कारखान्याचा मानस आहे. शेतकरी बांधावांना महत्वाच्या कामी खर्चा करीता पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून पहिल्या हप्त्यापोटी कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या उसास उचल म्हणून प्रतिटनाप्रमाणे २६०० रुपये अदा केलेले आहे. परिसरातील इतर कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याचा उसाचा पहिला हप्ता बरोबरीने राहणार आहे.
राऊत म्हणाले की, श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना हा नेहमीच शेतकरी हिताचा विचार करीत आलेला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला जातो. वेळेवर पेमेंट दिले जाते. या व्यतिरिक्त सभासदांना डिव्हिडंड पण दिला जातो. सामाजिक बांधिलकी म्हणून काही उपक्रम राबविले जातात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.





