रशियावरील निर्बंध आणखी कडक करा; युक्रेनच्या अध्यक्षांचे पाश्चात्य देशांना आवाहन

किव्ह – रशियन सैन्याने युक्रेनवरील हल्ले वाढवल्यामुळे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य देशांना रशियावरील निर्बंध आणखी कडक करण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी संध्याकाळी एका व्हिडिओ संदेशात, झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या लष्करी-औद्योगिक संकुलावर हल्ला करणाच्या रशियाच्या घोषणेवर कोणताच प्रतिसाद न दिल्याबद्दल पाश्चात्य नेत्यांवर टीका केली आहे.
यावर मी एकाही जागतिक नेत्याची प्रतिक्रिया ऐकली नाही, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. आक्रमकांचा उद्धटपणा वाढला असून त्यातून त्यांनी पाश्चिमात्य देशांना संकेत दिले आहेत की, त्यांनी रशियावर लादलेले निर्बंध पुरेसे नाहीत.
रशियावरील कारवाईसाठी न्यायाधिकरणाची स्थापना पाश्चात्य देशांनी केली पाहिजे अशी सुचनाही झेलेन्स्की यांनी केली आहे. सैन्याने युक्रेनच्या लष्करी-औद्योगिक संकुलावर अचूक शस्त्रांचा मारा करण्याची सुचना रशियाने रविवारी आपल्या लष्कराला केली आहे.





