लोकलमध्ये वाद झाल्याने 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

कल्याण – लोकल ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान भाषेवरून झालेल्या वादातून 19 वर्षीय अर्णव खैरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. वादामुळे अर्णवने मानसिक तणावातून कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता.
ट्रेनमध्ये चढताना काही तरुणांसोबत हिंदीत बोलला त्यावरून तुला मराठी बोलता येत नाही का? यावरून वाद झाला. मराठी बोलण्याची लाज वाटते का? असे बोलत त्याला मारहाण करण्यात आली. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली.
या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले. पण मानसिक तणावामुळे कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरात परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपबीती व्यक्त केली.
सायंकाळी सातच्या सुमारास वडील घरी आले असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले.
याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवचे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे.





