Noida 164 Foreigners : नोएडामध्ये १६४ परदेशी नागरिकांची सुटका; नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावण्यात आले
या सर्वांना आधी चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट काढून घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने सायबर फसवणूक करून घेतली जात होती.

Noida 164 Foreigners – नोएडामध्ये ओलीस ठेवलेल्या १६४ परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये ९२ इंडोनेशियन आणि ७२ मलेशियन नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना आधी चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट काढून घेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने सायबर फसवणूक करून घेतली जात होती.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी नोएडाच्या सेक्टर १३६ मध्ये सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकला. पोलिसांनी येथून ३५५ मोबाइल फोन, १७५ हून अधिक डेस्कटॉप आणि लॅपटॉप तसेच अनेक सिम कार्ड जप्त केले.
यामध्ये आंतरराष्ट्रीय सिम कार्डांचाही समावेश आहे. सुमारे १७५ पासपोर्टही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्व जण बिझनेस व्हिसावर भारतात आले होते. सायबर फसवणुकीच्या या प्रकरणात एका मलेशियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. तर, २ भारतीय नागरिक फरार आहेत.
दिल्लीचे जॉइंट सीपी (क्राइम) यांनी सांगितले की, सुमारे एक आठवड्यापूर्वी एका मलेशियन नागरिकाने ई-मेलद्वारे तक्रार केली होती. त्याच्यासोबत सायबर फसवणूक झाल्याचे त्याने सांगितले होते. प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नोएडाच्या सेक्टर १३६ मध्ये कॉल सेंटर असल्याचे समोर आले.
हे रॅकेट विशेषत: इंडोनेशिया आणि मलेशियातील लोकांना भारतात चांगला पगार आणि उत्तम करिअरचे आमिष दाखवून लक्ष्य करत होते. भारतात पोहोचल्यानंतर त्यांना ओलीस ठेवले जात होते. त्यांना एकट्याने कुठेही ये-जा करण्याची परवानगी दिली जात नव्हती.






