Pune Water Supply – पुणे शहरातील वाढते नागरीकीकरण आणि पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. खडकवासला धरण साखळीवरील ताण कमी करण्यासाठी मुळशी धरण ७ टीएमसी पाणी घेण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकार आणि टाटा कंपनीने तत्त्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. मागील आठवड्यात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आमदार राहुल कुल यांच्यासह टाटा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत विखे पाटील यांनी प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवत, पाण्याचे नियोजन करण्यासाठी तातडीने अभ्यास गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पावर कंपनीमार्फत भीरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते. प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणीसाठा १८.४७ टीएमसी, तर मृत साठा ८.१२ टीएमसी इतका आहे. पुणे शहराला सध्या प्रामुख्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे हे पाणी अपुरे पडत आहे. टाटा हायड्रो पावर मुळशी धरणातून पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडले जाणारे आणि पर्यायाने समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पुणे शहरासाठी वळवता येईल, असा पर्याय पुढे आला होता. टाटा कंपनी व राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेनंतर मुळशी धरणातून पुणे शहराला सात टीएमसी पाणी देण्याबाबत जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर मिळणाऱ्या तांत्रिक मान्यतेनुसार हा प्रकल्प पुढे जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. असे असणार नियोजन -जलसंपदा विभाग आणि टाटा कंपनीच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा एक विशेष गट तयार करण्यात आला आहे. – हे पाणी नेमके कधी, कोठे आणि कोणत्या तांत्रिक पद्धतीने (उदा. बोगदा किंवा वाहिनीद्वारे) वळवायचे, याचा तांत्रिक अभ्यास सध्या सुरू आहे. – पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत हा अभ्यास गट अहवाल सादर करेल. त्यानंतर या प्रस्तावाला अधिकृत तांत्रिक मान्यता दिली जाणार आहे. प्रकल्पाचे महत्त्व – ७ टीएमसी अतिरिक्त पाण्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम होईल. – हे पाणी प्रामुख्याने वीजनिर्मितीनंतर वाया जाणाऱ्या साठ्यातून वापरले जाणार आहे. – तांत्रिक मान्यतेनंतर या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी निधीची तरतूद केली जाईल.