Mulshi Dam: मुळशी तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी टाटा धरणातून अतिरिक्त २ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या मालकीचे असल्याने आणि नियोजित पाणीसाठा आधीच आरक्षित असल्याने, अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे सध्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. विधानपरिषदेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी डिसेंबर २०२५ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे २ टीएमसी वाढीव पाण्याची मागणी केली होती. यामध्ये मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा टप्पा १ व २ मधील ४४ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १.२० टीएमसी, तर कोळवण खोऱ्यातील ३००० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी ०.८० टीएमसी पाण्याची मागणी केली होती. Mulshi Dam यावर उत्तर देताना विखे पाटील यांनी सांगितले, की, मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि उपलब्धता टाटामार्फतच होते. हे जलसंपदा विभागाच्या थेट अखत्यारीत येत नाही. सन २००३ मध्ये टाटा कंपनीसोबत झालेल्या करारानुसार, मुळशी डोंगर मध्यम प्रकल्पातून मुळा नदीत १.६ टीएमसी पाणी सोडले जाते. यातून ५००० हेक्टर क्षेत्राचे सिंचन आणि पिण्याचे पाणी आरक्षित आहे. सध्याच्या आरक्षित कोट्यामध्ये अतिरिक्त पाणी शिल्लक नसल्याने नवीन मागणीनुसार पाणी देणे सद्यस्थितीत शक्य नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. Mulshi Dam हेही वाचा: Supreme Court : युसीसी हा समानतेचा मार्ग आहे : सर्वोच्च न्यायालय