Vaibhav Sooryavanshi Captaincy : चालू सामन्यात नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला करावी लागली कॅप्टन्सी? जाणून घ्या
Vaibhav Sooryavanshi Captaincy : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) थेट ईस्ट झोन संघाचे नेतृत्व करताना दिसला.

15 Year Old Vaibhav Sooryavanshi Leads East Zone In Duleep Trophy Semifinal 2026 : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या दुलीप ट्रॉफी २०२६ (Duleep Trophy 2026) स्पर्धेत एक ऐतिहासिक आणि थक्क करणारा क्षण पाहायला मिळाला. बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स-२’ मैदानावर ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) थेट ईस्ट झोन संघाचे नेतृत्व करताना दिसला. मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांसारख्या भारताच्या आंतरराष्ट्रीय अनुभवी गोलंदाजांना १५ वर्षांच्या वैभवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरावे लागल्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या सामन्याकडे वेधले गेले आहे.
यष्टिरक्षण करताना इशान किशन जखमी; मैदानातून थेट बाहेर –
या उपांत्य सामन्यात ईस्ट झोनचा नियमित कर्णधार इशान किशन यष्टिरक्षण करत होता. डावाच्या १९ व्या षटकात एक चेंडू वेगाने येऊन थेट त्याच्या उजव्या मनगटावर आदळला. तीव्र वेदना होत असल्याने फिजिओने मैदानावर येऊन तपासणी केली, मात्र दुखापत गंभीर असल्याने इशानला ताबडतोब मैदानाबाहेर जावे लागले. इशानच्या अनुपस्थितीत कुमार कुशाग्रने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली, तर उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीकडे संघाचे कार्यवाहक कर्णधारपद सोपवण्यात आले.
सीनिअर संघाचे पहिल्यांदाच नेतृत्व; अवघ्या १०व्या प्रथम श्रेणी सामन्यात कमाल –
Ladies and gentlemen, you are witnessing the youngest-ever captain in domestic cricket at the age of 15 — Vaibhav Suryavanshi. 🗿
Vaibhav Suryavanshi is the stand-in captain after Ishan Kishan got injured and left the field.
Vaibhav is captaining Mohammed Shami and Mukesh… pic.twitter.com/z0YanXTBN8
— Sonu (@Cricket_live247) August 30, 2026
वैभव सूर्यवंशीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा केवळ दुसरा दुलीप ट्रॉफी सामना असून एकूण १० वा प्रथम श्रेणी (First Class) सामना आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सीनिअर पुरुष क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची ही त्याची पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी २०२४ च्या सुरुवातीला रणजी करंडकात पदार्पण करत त्याने सर्वात कमी वयात रणजी खेळण्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला होता. आता मोहम्मद शमीसारख्या दिग्गज खेळाडूचा समावेश असलेल्या संघाचे नेतृत्व करून त्याने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत गोलंदाजीत चमक; आता उपांत्य फेरीत मोठी जबाबदारी!
नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत वैभवला फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती आणि तो ८ चेंडूंत ६ धावा करून बाद झाला होता; मात्र गोलंदाजीत त्याने महत्त्वपूर्ण २ विकेट्स मिळवून संघाच्या विजयात हातभार लावला होता. आता दुखापतग्रस्त कर्णधाराच्या जागी थेट नेतृत्व मिळाल्याने, ईस्ट झोनला अंतिम फेरीत पोहोचवण्याचे आणि स्वतःचे नेतृत्वकौशल्य सिद्ध करण्याचे मोठे आव्हान या युवा खेळाडूसमोर असणार आहे.





