सोन्याच्या खाणीत भूस्खलनामुळे 15 ठार, 12 बेपत्ता

पेदांग, (इंडोनेशिया) – इंडोनेशियात सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एका बेकायदेशीर सोन्याच्या खाणीत भूस्खलन झाले असून या दुर्घटनेत किमान १५ कामगार ठार झाले आहेत. तर डझनभर अन्य कामगार बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम सुमात्रा प्रांतातील दुर्गम सोलोक जिल्ह्यात ग्रामस्थ सोन्याच्या कणांसाठी गुरुवारी खोदकाम करत होते तेव्हा आजूबाजूच्या डोंगरांवरचा चिखल खाणीत कोसळला आणि हे कामगार गाडले गेले, असे स्थानिक आपत्ती निवारण एजन्सी कार्यालयाचे प्रमुख इरवान एफेंडी यांनी सांगितले.
किमान २५ लोक अजूनही गाडलेले असून बचावकर्त्यांनी जखमी झालेल्या तीन लोकांना जिवंत बाहेर काढले आहे. सुंगई अबू गावाजवळील सर्वात जास्त प्रभावित भागात शोध प्रयत्नांना चिखलामुळे अडथळा निर्माण झाला आहे. हे भूस्खलन बऱ्याच मोठ्या बागावर झाले असून अंधार आणि दूरसंचाराचा अभावामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. उद्ध्वस्त खाण क्षेत्रापाशी जवळच्या वस्तीपासून चार तास चालत जाऊन पोहोचता येते, असे एजन्सीचे प्रवक्ते इल्हाम वहाब यांनी सांगितले.
इंडोनेशियामध्ये अनधिकृत खाण उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. या उद्योगामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो. जीवावर उदार होऊन आणि मोठा धोका पत्करून लोक अशा खाणींमधून सोने मिळवण्याच्या कामात गुंतलेले असतात. भूस्खलन, पूर आणि बोगदे कोसळणे हे खाण कामगारांना भेडसावणारे काही धोके आहेत. बहुतेक सोन्याच्या धातूच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत विषारी पारा आणि सायनाइडचा समावेश असतो आणि कामगार अत्यंत कमी किंवा कोणतेही संरक्षण वापरत नाहीत.





