काराकस, (व्हेनेझुएला) : व्हेनेझुएलामधील एल काल्लाओ येथे मुसळधार पावसामुळे एक सोन्याची खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान १४ जण ठार झाले. खाणीमध्ये मरण पावलेल्यां कामगारांचे मृतदेह बाहेर काढणे आणि मदत कार्यासाठी एक कमांडकेंटर स्थापन करण्यात आले आहे. राजधानी कॅराकसच्या अग्नेयेला ८५० किलोमीटर अंतरावरच्या क्वार्टो एसक्विनास डी कॅराटल या खाणीच्या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये ही दुर्घटना घडली आहे. खाणीमध्ये घुसलेले पावसाचे पाणी पंपाने उपसून काढण्यात येते आहे. हे पाणी काढल्यानंतरच खाणीत अडलेल्यांना बाहेर काढणे शक्य होणार आहे, असे सरकारी निवेदनामध्ये म्हटले आहे. मात्र खाणींच्या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती यामध्ये नमूद केली गेलेली नाही. एल काल्लाओ या खाणीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्यासाठी उत्खनन केले जाते. एल काल्लाओ या शहराची संपूर्ण अर्थव्यवस्था खाण उद्योगावर अवलंबून आहे. सुमारे ३० हजार कर्मचारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या खाण उद्योगावर अवलंबून आले. व्हेनेझुएलामध्ये तांबे, हिरे आणि अन्य मौल्यवान खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र तेथील सुरक्षिततेच्या उपायांकडे नेहमीच दुर्लक्ष केलेले असते. खाण उद्योगाचे नियमन व्यवस्थित न झाल्यामुळे अशा दुर्घटना अधूनमधून घडत असतात.