गोपेश्वर (उत्तरप्रदेश) : उत्तराखंडच्या चमोलीत भूस्खलनाची दुर्घटना घडली आहे. तसेच काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये पुरामुळे ३० हून अधिक घरे जमीनदोस्त झाले असून एकाचा मृत्यू आहे. तसेच ११ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देहरादूनपासून सुमारे २६० किमी आणि गोपेश्वर येथील चमोली जिल्हा मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर जमीन खचल्याने भूस्खलन झाले. यात अनेक घरे, दुकाने आणि मालमत्तेचे मोठे नुकसार झाले. यात सुमारे २० जण जखमी झाले असून चौदा जण बेपत्ता आहेत. या भूस्खलनानंतर पोलिस अधीक्षकांच्या देखरेखीखाली एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये २०० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. देहरादून आणि परिसरात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे अनेक पूल वाहून गेले असून घरांचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलनात २१ नागरिकांचा मृत्यू झाला असून १७ जण बेपत्ता आहेत.