कसबा मतदार संघातील १४ अर्ज वैध; २० उमेदवारांनी भरले होते २९ अर्ज

पुणे – कसबा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी २० उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले होते. त्यातील १४ जणांचे अर्ज वैध ठरले असून सहा अर्ज बाद झाले आहेत. कसबा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते यांनी माहिती दिली.
शपथपत्र अपूर्ण असल्याने (फॉर्म २६ अपूर्ण) हे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. भाजप कडून हेमंत रासने, कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि मनसेकडून गणेश भोकरे या राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
याशिवाय सनय छत्रपती शासन पक्षाकडून अरविंद वलेकर, महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून अॅड. ओंकार येनपुरे, वंचित बहुजन आघाडी कडून प्रफुल्ल गुजर, राष्ट्रीय समाज पक्षाकडून शैलेश काची, बहुजन समाज पार्टी आंबेडकर गटाकडून सय्यद बाबा या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आकाश खांडेकर, कमल व्यवहारे, गणेश बढाई, मुख्तार शेख, सुरेशकुमार ओसवाल, हुसेन शेख या अपक्षांचे अर्जही वैध ठरले आहेत.
अर्ज माघारीसाठी फक्त दोनच दिवस
अर्ज माघारीसाठी फक्त दोनच दिवस मिळत असून, शुक्रवार, दि. २५ अॉक्टो. आणि सोमवार, ४ नोव्हेंबर हे दोनच दिवस यासाठी आहेत. २६-२७ अॉक्टोबर ही साप्ताहिक सुट्टी असून २८ अॉक्टोबर ते ३ नोव्हेंबर हे सात दिवस दिवाळीची सुटी आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्यासाठी केवळ दोनच दिवस उमेदवारांना मिळणार आहेत.





