Pakistan News : पाक आदिवासींमधील संघर्षातील मृतांची संख्या १२४ वर; इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद !

Pakistan News – पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतात शिया आणि सुन्नी आदिवासींमध्ये सुरू असलेल्या संघर्षात मरण पावणाऱ्यांची संख्या आता वाढून १२४ झाली आहे. या आदिवासींमध्ये शस्त्रसंधी करण्याचा प्रयत्न अपयशी झाला असून अजूनही तुरळक प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षामध्ये १७० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अशांतता असलेल्या प्रदेशांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी सूचना खैबर पख्तुनक्वा प्रांताचे गव्हर्नर फैजल करीम कुंदी यांनी मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर यांना केली आहे.
कुर्रम जिल्ह्यात २२ नोव्हेंबरला पाराचिनार भागाजवळ वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात किमान ४७ जण ठार झाले होते. त्यानंतर अलिझाई आणि बगान आदिवासी जमातींमधील या संघर्षाला सुरुवात झाली. यावेळी गंभीर जखमी झालेल्या काही अन्य प्रवाशांचा नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या ५७ झाली.
गेल्या दोन दिवसातल्या हिंसाचारामध्ये किमान ३७ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. बगान बझार भागात सुरू झालेल्या या हिंसाचाराचे लोण बालिशखेल, खार, काली, जुंज अलीझाई आणि मकबाल सारख्या इतर भागांमध्ये पसरले.
सरकारने मध्यस्थी करून ७ दिवसांची शस्त्रसंधी घडवून आणली होती. त्याला नंतर १० दिवसांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पेशावर – पारचिनार महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून इंटरनेट आणि मोबाईल सेवाही स्थगित करण्यात आली आहे.





