satara | पीक विमा योजनेतून १२ कोटींची नुकसान भरपाई

खंडाळा, (प्रतिनिधी) – कृषी विभागामार्फत खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नियमितपणे विविध योजना, प्रशिक्षण, शिबिर, पीक स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात येते.
यामधून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देणे, त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, योजनेचा लाभ मिळवून देणे या हेतूने खंडाळा तालुका कृषी विभाग सदैव प्रयत्नशील असून तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून तब्बल १२ कोटींची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती खंडाळा तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे,यांनी दिली.
यामध्ये सन २०२३-२४ खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत सुमारे १८ हजार शेतकऱ्यांना सहभागी करून तब्बल १२ कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत. तसेच कृषी विभागामार्फत खंडाळा तालुक्यात कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, शेततळे, फलोत्पादन विकास कार्यक्रम, फळबाग लागवड अशा विविध योजनांच्या माध्यमातून जवळपास ४९० शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना राबवण्यातही खंडाळा तालुका कृषी विभाग संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. २०२२-२३ व २०२३-२४ या दोन्ही वर्षात मिळून ८० प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे.
यामध्ये दुग्धप्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया, फळ प्रक्रिया, मुरघास प्रक्रिया, तेल प्रक्रिया, खाद्य प्रक्रिया असे अनेक प्रकल्प मंजूर करून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक स्त्रोत निर्माण करून दिला आहे. या शेतकऱ्यांचे मनोबल वाढण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा व पुरस्कारांचेही आयोजन केले जाते, अशी माहिती गजानन ननावरे व कृषी कार्यालयामार्फत देण्यात आली.
कृषी विभागामुळे फळ-पिकांचा यादीत समावेश
याआधी सोयाबीन हे पीक खंडाळा तालुक्यासाठी विम्याच्या कक्षेत येत नव्हते, यासह पेरू, सिताफळ, आंबा यांचाही फळ विम्यात समावेश नव्हता. या फळ व पीकांचे लागवडीचे प्रमाण समाधानकारक असल्याने कृषी विभागाच्या पाठपुरामुळे यांचा समावेश विम्याच्या योजनेमध्ये करण्यात आल्याने शेतकरी वर्गाला आता नुकसानाची भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.





