Lonand Accident – लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबवे (ता. फलटण) येथील भैरवनाथ मंगल कार्यालयासमोर लोणंद- सातारा रस्त्यावर बुधवारी (दि. 11) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास एसटी बस व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात नामदेव राघू बोडरे (वय 55, रा. कोपर्डे, ता. खंडाळा) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव बोडरे मोटारसायकलवरुन (एमएच०४ एयू ५६८८)जात असताना समोरून येणाऱ्या एसटी बसने (एमएच १४ बीटी ४६७२) धडक दिली. या धडकेत बोडरे खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दशरथ भगवान बोडरे (वय 46, रा. कोपर्डे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एसटी बसचालक प्रमोद रामचंद्र राजमाने (वय 42, रा. खंडाळा, जि. सातारा) याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत. रस्त्याचे काम; अपघातांना निमंत्रण लोणंद- सातारा मार्गावरील तांबवे परिसरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. अपूर्ण रस्ता, खडी आणि इशारा फलकांचा अभाव यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असून आतापर्यंत अनेक जणांचा बळी गेला आहे किंवा काही जण जायबंदी झाले आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रमेश शिंदे यांनी केली आहे.