car accident – उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. गोंडा येथील पृथ्वीनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणारी एक बोलेरो कार अनियंत्रित होऊन कालव्यात पडली. त्यावेळी ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये मोतीगंज पोलीस ठाण्याच्या सिहागावचे रहिवासी आहेत. इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलवा बहुता रेहरा मोडजवळ हा रस्ता अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ५ महिला आणि ६ पुरुष आहेत. या दुर्घटनेत चालक मात्र बचावला आहे. मुसळधार पावसात गोंडातील एक बोलेरो अनियंत्रित होऊन सरयू कालव्यात पडली. मृतांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. बोलेरोमध्ये एकूण १५ जण होते. हे सर्व लोक श्रावण महिन्यात पृथ्वीनाथ मंदिरात जल अर्पण करण्यासाठी जात होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, बोलेरो कारचा दरवाजा उघडला जात नव्हता. आत असलेले लोक जीव वाचवण्याची याचना करत होते. गाडीच्या काचा फोडून लोकांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत बीणा (३५) काजल (२२) महक (१२), दुर्गेश, नंदिनी, अंकित, शुभ, संजू वर्मा, अंजू, सौम्या यांचा मृत्यु झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रस्ते अपघाताची तात्काळ दखल घेतली. त्यांनी मृतांच्या शोकाकुल कुटुंबांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या शोकाकुल कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.