Israeli attack : गाझामधील इस्रायलच्या हल्लयात १०३ जण ठार

देर अल-बलाह (गाझा पट्टा) – इस्रायली सैन्याने रात्रभरात संपूर्ण गाझा पट्ट्यामध्ये केलेल्या हल्ल्यात किमान १०३ जण ठार झाले आहेत. अशी माहिती रुग्णालय आणि वैद्यकीय सूत्रांनी दिली. इस्रायलने नव्याने वाढवलेल्या हल्ल्यामुळे गाझाच्या उत्तर भागातील मुख्य रुग्णालय बंद करावे लागले आहे.
दक्षिणेकडीलखान युनिसशहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये ४८ पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत. काही घरांवर आणि विस्थापितांच्या तंबूंवरही इस्रायलने विमानातून बॉम्बफेक केली. ठिकाणच्या मृतांमध्ये १८ लहान मुले आणि १३ महिलांचाही समावेश आहे, असे नासेर रुग्णालयाने म्हटले आहे.
जबालिया शहरातील शरणार्थ्यांच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील किमान ९ जण ठार झाले. तर जबालिया शहरातच झालेल्या एका अन्य हल्ल्यामध्ये ७ हलान मुले आणि एका महिलेसह १० ठार झाले.
हमासने हंगामी युद्धबंदी मान्य करावी आणि ओलिसांची सुटका करावी, यासाठी हमासवर दबाव आणण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे. तर इस्रायलच्या सैन्याने गाझामधून पुर्ण माघार घ्यावी, अशी हमासची मागणी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायल-गाझामध्ये आल्यानंतरच युद्धबंदीचा अंतिम निर्णय होईल, असे इस्रायलने म्हटले आहे.
गिडोन्स कॅरिओट
इस्रायलने गाझा पट्ट्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या लष्करी मोहिमेला गिडोन्स कॅरिओट असे नाव दिले आहे. गाझामधील भूभाग ताब्यात घेण्यासाठी आणि हजारो पॅलेस्टिनींना गाझाच्या दक्षिण भागामध्ये विस्थापित करण्यासाठी आणि वितरीत करण्यात येणाऱ्या मदतीच्या व्यवस्थेचे नियंत्रण घेण्यासाठी इस्रायलने ही लष्करी मोहिम सुरू केली आहे.





