Pune District : बारामतीत 100 टक्के डिजिटल मॅपिंग पूर्ण
Pune District ; तांत्रिक सहाय्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे संबंधित बीएलओंना उद्दिष्ट मुदतीपूर्वी पूर्ण करणे शक्य झाले.

बारामती : विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार पडताळणी आणि डिजिटल मॅपिंगचे काम बारामती तालुक्यातील आठ मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी (बीएलओ) मुदतीपूर्वीच शंभर टक्के पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सातत्याने आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. तांत्रिक सहाय्य, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांमुळे संबंधित बीएलओंना उद्दिष्ट मुदतीपूर्वी पूर्ण करणे शक्य झाले.
या मोहिमेत रणजित दिलीप ननवरे (यादी भाग क्र. 3), पोपट गुलाबराव कोकरे (भाग क्र. 35), विलास महादेव देवकाते (भाग क्र. 102), विशाल धुळे (भाग क्र. 246), गणेश अरुण गायकवाड (भाग क्र. 253), पुष्पा मधुकर वाबळे (भाग क्र. 349), सुनिल रघुनाथ घाडगे (भाग क्र. 366) आणि सोमनाथ नारायण वाघमोडे (भाग क्र. 372) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदारांची पडताळणी, माहिती संकलन, ऑनलाइन नोंदणी आणि डिजिटल मॅपिंगचे काम शंभर टक्के पूर्ण केले.
या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते संबंधित बीएलओंना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय कर्तव्याप्रती दाखविलेली निष्ठा, समर्पित सेवा आणि उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.





