पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 4 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त आठ दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
पंडित बालाजीराव म्हस्के असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना मे ते 19 सप्टेंबर 2016 या कालावधीत मांजरी भागात घडली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी 10 साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.
पीडित कुटुंबियांने मांजरी भागात भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत होती. आरोपीने “तु मला आवडतेस व तु मला हवे ते करू न दिल्यास तुला आणि तुझ्या भावाला जीवे ठार मारेन’ अशी धमकी दिली. घराच्या मागे कपडे धुण्यासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ऍट्रॉसिटी, बलात्कार, धमकाविणे कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने बलात्कार, धमकाविणेच्या कलमानुसार शिक्षा सुनावली. तर, ऍट्रॉसिटीच्या कलमातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.





