कॉंग्रेसने बोलावलेल्या बैठकीला 10 विरोधी पक्षांचा प्रतिसाद; तृणमूल, आप राहिले दूर

नवी दिल्ली -कॉंग्रेसने सोमवारी बोलावलेल्या बैठकीत 10 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले. मात्र, तृणमूल कॉंग्रेस आणि आप त्या बैठकीपासून दूर राहिले. त्यामुळे संसदेत विरोधकांना एकत्र आणण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नसल्याचे मानले जात आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी सकाळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुढाकारातून विरोधी पक्षांची बैठक झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस, द्रमुक, राजद, आययूएमएल, भाकप, माकप, आरएसपी, लोजद, नॅशनल कॉन्फरन्स आणि एमडीएमके या पक्षांचे नेते त्या बैठकीला उपस्थित राहिले.
संसदेतील विरोधकांची संयुक्त रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशातून ती बैठक झाली. मात्र, तृणमूल आणि आपच्या अनुपस्थितीमुळे विरोधक एकवटले नसल्याचेच चित्र समोर आले. भाजपविरोधात राजकीय संघर्ष करण्यासाठी एकत्र येण्याचा सूर विरोधकांकडून आळवला जात आहे.
प्रत्यक्षात विरोधकांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे कॉंग्रेसने बोलावलेल्या बैठकीने सूचित झाले. त्यामुळे संसदेत मोदी सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्यात विरोधकांना यश मिळणार का याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.




