Pune : १० नव्या मेट्रो मार्गिकांचा DPDC च्या बैठकीत प्रस्ताव; पुढच्या ३० वर्षांचे नियोजन सादर

पुणेः नुकतेच एका सर्वेक्षण अहवालात पुणे शहर वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात तिसऱ्या तर देशात चौथ्या स्थानावर असल्याचे समोर आले होते. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील ट्रफिकची समस्या वाढताना दिसत आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून पुणे शहर आणि परिसरात १० नव्या मेट्रो मार्गिकांचा प्रस्ताव डीपीडीसीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणेकरांसाठी तब्बल २७६ किलोमीटर लांबीच्या नव्या मेट्रो मार्गांचा प्रस्तावर सादर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या ठिकाणांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३० वर्षांसाठीच्या आराखडा सादर करण्यात आला आहे. याशिवाय पुण्यात एकूण सहा नवे बीआरटी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहेत.
तीन टप्प्यांमध्ये हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी एकूण १ लाख २६ हजार ४९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढच्या तीस वर्षांमध्ये हा खर्च टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. तसेच दहा नव्या मेट्रोच्या मार्गिकांमध्ये पुणे शहरात फिरणाऱ्या मार्गिकांसोबतच पुणे शहराबाहेरील ठिकाणांशी जोडले जाणार आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारडे पाठण्यात आला आहे.
६ हजार बसेची आवश्यकता
मेट्रोप्रमाणेच शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पीएमपीएमएलसाठी नव्या बसेसचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ६ हजार नव्या बसेसची आवश्यकता असून त्यात काही इलेक्ट्रीक बसेसचा देखील समावेश असणार आहे. याशिवाय नवे ६४१ बस मार्ग, १८ अतिरिक्त करिडॉर आणि २० नव्या बस स्थानकांचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे.
हे आहेत नवे प्रस्तावित मेट्रो मार्ग
वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, जिल्हा न्यायालय ते येवलेवाडी, विद्यापीठ चौक ते देहू रोड, खराडी ते खडकवासला, निगडी ते चाकण, हडपसर ते सासवड रोड, हडपसर ते लोणी काळभोर, जिल्हा न्यायालय ते आळंदी वाकड, चौक ते शेवाळेवाडी





