Nagar | पाझर तलाव व साठवण बंधारा दुरुस्तीसाठी 1 कोटी 40 लाखांचा निधी : आ. कानडे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील पाझर तलाव व साठवण बंधारा दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजना सन 202 – 25 अंतर्गत 1 कोटी 40 लाख 57 हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव, खिर्डी, पढेगाव, वांगी व बेलापूर (ऐनतपुर) येथील पाझर तलाव व साठवण बंधाऱ्याचा त्यात समावेश आहे. पाझर तलाव व बंधाऱ्याच्या गळती व नादुरुस्तीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळत नव्हता. या पाझर तलाव, बंधारा दुरुस्तीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होती.
त्यानुसार या गावातील पाझर तलाव व साठवण बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. समितीच्या बैठकीत यासाठी एक कोटी 40 लाख 57 हजार 410 रुपये खर्च प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव दगडी साठवण बंधाऱ्यासाठी 27 लाख 79 हजार रुपये, खिर्डी पाझर तलाव दुरुस्तीसाठी 26 लाख 5 हजार रुपये, पढेगाव येथील दगडी साठवण बंधाऱ्यासाठी 22 लाख 54 हजार रुपये, वांगी येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी 27 लाख 33 हजार रुपये,
बेलापूर (ऐनतपुर) येथील खटकाळी येथील साठवण बंधारा दुरुस्तीसाठी 20 लाख 61 हजार रुपये तसेच बेलापूर (ऐनतपुर) येथील बंगाळवस्ती साठवण बंधारा दुरुस्तीसाठी 16 लाख 22 हजार रुपये असे एकूण एक कोटी चाळीस लाख 57 हजार 410 रुपये खर्चाच्या निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.





