Satara News : साताऱ्यात भाजप नगरसेवकांची जोरदार कानउघाडणी; उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजेंचा थेट इशारा
Satara News : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी दोन नेत्यांची नावे वरिष्ठांकडे; महायुतीच्या उमेदवाराबाबत शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा खुलासा.

Satara News – नगरपालिकेतील वाढत्या अंतर्गत कुरघोड्या, प्रभागनिहाय वाद आणि नगरसेवकांतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी फर्न हॉटेलमध्ये भाजप नगरसेवकांची संयुक्त बैठक घेत जोरदार कानउघाडणी केली. ‘आता आघाड्यांचे राजकारण संपले आहे. आपण सर्व भाजपचे नगरसेवक आहोत. पक्षशिस्त आणि एकोपा महत्त्वाचा आहे,’ असा स्पष्ट संदेश दोन्ही राजेंनी यावेळी दिला.
बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष आक्रमक भूमिका घेत नगरसेवकांतील अंतर्गत संघर्षावर नाराजी व्यक्त केली. ‘तुमच्यातील वादाचा परिणाम आमच्यावर होतो. राज्यात अनेक जण आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. विधिमंडळातसुद्धा याची उत्तरे द्यावी लागतात. साडेतीन वर्षांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आतापासूनच संघटित राहणे गरजेचे आहे,” नव्या नगरसेवकांना सांभाळून घ्या, उगाच उणीदुणी काढू नका.
कोणताही विषय समन्वयाने चर्चा करूनच सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर आणा, असा सल्लाही त्यांनी दिला. जुन्या नगरसेवकांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत नव्या सदस्यांच्या सूचनांनाही महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पालिका प्रशासनातील हस्तक्षेप, मुकादम बदल्या आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर बोलताना शिवेंद्रसिंहराजेंनी थेट इशारा दिला. “मुकादम म्हणजे दोन नगरसेवकांनी एकमेकांच्या अंगावर माणसे सोडण्याचे केंद्र बनले आहे. त्यामुळे वाद वाढतात.
अशा ठिकाणी तिसरा माणूस द्या,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. शहरातील हॉकर्सचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन उभारण्याची सूचनाही त्यांनी केली. पालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणण्याचे आश्वासन दिले; मात्र ‘स्वनिधीचे स्रोत बळकट करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असा सल्ला प्रशासनाला दिला.
खासदार उदयनराजे भोसले यांनीही नगरसेवकांना स्पष्ट शब्दांत सुनावले. ‘नागरिकांनी आपल्याला विकासासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे प्रभागनिहाय गटबाजी नको. प्रत्येक प्रभागात समित्या तयार करून नागरिकांच्या सूचना घ्या आणि महत्त्वाचे विषय सभागृहात आणा,” असे त्यांनी सांगितले.
सातारा- सांगलीसाठी दोन नावे वरिष्ठांकडे
सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातून लोकसभा संयोजक सुनील काटकर आणि धैर्यशील कदम या दोघांची नावे पाठवण्यात आली आहेत .ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्राताई पवार व शिवसेनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणारी याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतून होणार आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून कोणाला उमेदवारी मिळणार हा विषय चर्चेला जाणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून सध्या तरी दोघांची नावे पाठवण्यात आल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.






