Devendra Fadnavis – मराठा समाजासाठी राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. अनेक मराठा तरुण आयएएस, आयपीएस आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत. मराठा समाजासाठी जे काम आमच्या सरकारने केले, ते इतिहासात यापूर्वी इतर कोणत्याही सरकारने केले नाही. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत न्यायालयाने ठरवलेल्या निकषांनुसारच काम सुरू आहे. समितीला पूर्णपणे स्वायत्तता असून, त्या समितीमध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कृषी महाविद्यालय येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की मराठा समाजासाठीच्या योजना बंद किंवा मंदावलेल्या नसून अधिक ताकदीने राबवल्या जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार झाले आहेत. शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि निर्वाह भत्ता योजना सुरू असून, कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जेवढे काम केले, ते महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही सरकारने केले नाही. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येईल. सातारा गॅझेट संदर्भातील प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने कायदेशीर सल्ल्यानुसारच सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. कांदा प्रश्नावर विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात आखाती देशांमध्ये कमी झाली आहे. उत्पादन जास्त आणि खरेदीदार कमी असल्याने दर घसरले आहेत. केंद्र सरकारने कालपासून साडेबारा रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू केली असून, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. राज्य सरकारची कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून, यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे. काही अतिरिक्त माहिती मागवण्यात आली असून, ती आल्यानंतर प्रक्रिया सुरू केली जाईल. 30 जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्या भेटीबद्दल विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की पार्थ पवार यांची भेट झाली. या भेटीत प्रशासकीय, तसेच राजकीय विषयांवर चर्चा झाली. ते आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते भेटले. यामध्ये मोठी बातमी आहे, असे मला वाटत नाही, असे सांगत त्यांनी या भेटीवर अधिक बोलणे टाळले.