Satara: ढोल-ताशांच्या गजरात 58 गणेश मंडळांचा बाप्पांना निरोप
Satara शहरातील काही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या आधी काढण्यात येतात. यंदा 11 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता करणार्या सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35 आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 23, अशा एकूण 58 मंडळांच्या मिरवणुका गुरुवारी शिस्तबद्धरीत्या काढण्यात आल्या.

Satara: ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात आणि ‘गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सातारा शहरात विसर्जन मिरवणुकांना गुरुवारी दुपारी 3 नंतर जल्लोषात सुरुवात झाली. गुरुवार पेठेतील मानाच्या शंकर-पार्वती गणपती मंडळाच्या पूजनानंतर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तब्बल 17 तासांच्या जल्लोषी मिरवणुकांनी बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
शहरातील काही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अनंत चतुर्दशीच्या आधी काढण्यात येतात. यंदा 11 दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता करणार्या सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35 आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 23, अशा एकूण 58 मंडळांच्या मिरवणुका गुरुवारी शिस्तबद्धरीत्या काढण्यात आल्या. सातारा तालुक्यात एकूण 53 आणि बोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत 29 सार्वजनिक मंडळांनी गणरायला भावपूर्ण निरोप दिला. या मिरवणुकांसाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यापैकी साडेसातशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी सातारा शहरातील मिरवणूक मार्गावर तैनात होते.
राजवाडा, मोती तळे, प्रतापगंज पेठ, मोती चौक या मार्गावर दुपारनंतर टप्प्याटप्प्याने गणेश मंडळांच्या मिरवणकुकांचे आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर आणि गणेशभक्तांनी केलेला जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. राजपथावर एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुका मोती चौकातून गोलबागेला वळसा घालून, मोती चौकातून प्रतापगंज पेठमार्गे बुधवार नाका येथील विसर्जन तळ्याकडे रवाना झाल्या.
शंकर-पार्वती मंडळाच्या आरतीनंतर मिरवणूक मार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते बंद करून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. रात्रीपर्यंत शहरातील प्रमुख मार्गांवर जणू यात्रा भरली होती. बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती देऊन, ध्वनिवर्धक यंत्रणांचा वापर टाळला. बुधवार नाका विसर्जन तळ्यावर पालिकेने 18 कर्मचारी, सहा जीवरक्षक आणि 50 फुटी हायड्रोलिक क्रेन तैनात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी या तयारीची पाहणी केली. हा विसर्जन सोहळा तब्बल 17 तासांच्या जल्लोषात पार पडला.
शहरात पाच ठिकाणी विसर्जन तळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उपनगरातील काही मंडळांनी संगम माहुली येथे कृष्णा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणांवर लक्ष ठेवण्यासाठी सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान, 14 हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघटनांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात मूक मोर्चा काढला. पालिकेने आयोजित केलेल्या सुंदर देखावा स्पर्धेसाठी नियुक्त पथकही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मिरवणुकीतील बंदोबस्त आणि पोलिसांच्या तयारीचा आढावा घेतला. सातारा शहरचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रवेशद्वारांसह मिरवणूक मार्गावर स्वतंत्र पथके तैनात होती.





