Satara: रांगोळींतून उमटला सर्जनशीलतेचा रंग; कर्मवीर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा
Satara रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य जयसिंह विक्रमसिंह माने यांच्या हस्ते झाले. यावेळी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथील सौ. वासंती जाधव व सौ. पुष्पा राठोड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Satara: रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्युनिअर विभागातील तब्बल 90 विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे मनोहरी दर्शन घडविले.
रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संभाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य जयसिंह विक्रमसिंह माने यांच्या हस्ते झाले. यावेळी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथील सौ. वासंती जाधव व सौ. पुष्पा राठोड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी जयसिंह माने म्हणाले, रांगोळी ही केवळ सजावटीची कला नसून ती भारतीय संस्कृती, कल्पकता आणि सामाजिक संदेश व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत साकारलेल्या रांगोळ्या निश्चितच कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते.
प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. शिक्षणाबरोबरच कला, संस्कृती, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव विकसित होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.
स्पर्धेत विद्यार्थिनींनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच पर्यावरणविषयक विविध विषयांवर आधारित आकर्षक, कल्पक व संदेशप्रधान रांगोळ्या साकारल्या.
कार्यक्रमास उपप्राचार्य सौ. आसावरी शिंदे, प्रा. संदीप भुजबळ, लाईफ वर्कर गणेश लोहार, अभय पाटील, विशाल संदे तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन व समन्वय मयुरी कुलकर्णी व अप्सरा लोखंडे यांनी केले.





