Petrol-Diesel prices : “जागतिक इंधन दरवाढीच्या झळांपासून भारतीय ग्राहकांचा बचाव” – हरदीप सिंग पुरी
यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१, मे २०२२ आणि १० मार्च २०२६ अशा तीन वेळा उत्पादन शुल्कात कपात केली.

Petrol-Diesel prices – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे जागतिक इंधन दरवाढीच्या धक्क्यांपासून भारतीय ग्राहकांचे संरक्षण झाले असून, आंतरराष्ट्रीय संकटाच्या काळातही देशांतर्गत किरकोळ इंधन दर मोठ्या प्रमाणात स्थिर राहिले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केले आहे.
मध्य प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य असलेल्या पुरी यांनी रविवारी इंदूरमधील पेट्रोल पंपांची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१, मे २०२२ आणि १० मार्च २०२६ अशा तीन वेळा उत्पादन शुल्कात कपात केली. त्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती ५० ते ७० टक्क्यांनी वाढल्या असताना भारतात ही वाढ सुमारे सात टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली.
कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६०-६५ डॉलरवरून १२० डॉलरपर्यंत पोहोचले असतानाही मोठ्या प्रमाणात तोटा सहन केल्याबद्दल त्यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल विपणन कंपन्यांचे कौतुक केले.
इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे विरोधकांचे दावे निराधार अफवा असल्याचे सांगत पुरी यांनी फेटाळून लावले. देशभरात इंधन पुरवठा अखंडित सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या १,०७,००० किरकोळ विक्री केंद्रांपैकी एकाही ठिकाणी इंधन संपल्याची घटना घडली नाही.
गेल्या संसदीय अधिवेशनादरम्यान आमच्या राजकीय मित्रांनी गॅस सिलिंडरचे कटआऊट घेऊन माझे स्वागत केले होते आणि मोठे संकट येणार असून एलपीजी सिलिंडर संपल्याचा दावा केला होता. परंतु, आम्ही देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवल्यामुळे कोठेही तुटवडा भासला नाही, असे पुरी म्हणाले.






