Khatu Shyamji Rajasthan : खाटू श्यामजींच्या दर्शनाहून परतताना काळाचा घाला.! महाराष्ट्रातील ९ भाविकांचा अपघातात मृत्यू, ८ जण जखमी
या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या वारसदारांना २ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Khatu Shyamji Rajasthan – खाटू श्यामजींच्या दर्शनावरून महाराष्ट्राकडे परतत असलेल्या धुळे येथील नागरिकांच्या वाहनाला शंभूपुरा गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींवर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथील ३६ नातेवाईकांचा एक गट १७ नोव्हेंबर रोजी तीन वाहनांमधून ओंकारेश्वर, उज्जैन, सांवरिया सेठ, पुष्कर, सालासर बालाजी आणि अखेरीस खाटू श्यामजी येथे तीर्थयात्रेसाठी गेला होता.
दर्शनावरून परतताना रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली.
ही धडक इतकी भीषण होती की, वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच नंता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने कोटा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये बहुतांश एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. वाहनात एकूण 16 जण होते आणि सर्व धुळे जिल्ह्यातील होते. अपघातामधील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या वारसदारांना २ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.






