Chhagan Bhujbal : “मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही” – छगन भुजबळ
एकीकडे आंदोलक मनोज जरांगे यांची 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक घेतली आहे.

Manoj Jarange – एकीकडे आंदोलक मनोज जरांगे यांची 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समता परिषदेची बैठक झाली नव्हती. राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत संवाद केला.
समता परिषदेच्या सर्व कार्यक्रमांची उजळणी केल्याचे सांगत भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी, जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावरही त्यांनी भूमिका मांडली. तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेले वक्तव्य अमान्य असल्याचे त्यांनी म्हटले.
भूजबळ म्हणाले, कोण म्हणते ओबीसीचे आरक्षण संपले? जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढत आहोत. 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार, असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच, जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर सरकार बोलतील आणि निर्णय घेतील. ओबीसीमध्ये किती जाती आहेत त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. सरकार आमच्यासोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.





